श्रीनगर- भारत आणि चीन यांच्यात लडाख भागात तणाव निर्माण झाला असल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातो आहे. त्या देशानेही आता व्याप्त काश्मिरात हालचाली सुरूकेल्या असून चीन आडून पाकनेही अगाउपणा सुरू केल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.
एखाद्या मोहिमेच्या अगोदर जशी तयारी केली जाते, तशी तयारी पाकिस्तानने या भागात सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्याप्त काश्मिरातील रूग्णालयांतील 50 टक्के खाटा सैनिकांसाठीआरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानी हवाईदलाच्या तीन धावपट्ट्यांची सज्जता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चीनच्या हवाईदलानेही या भागाला भेट देत याधावपट्ट्यांची पाहणी केली असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, चीनसोबत लडाखमध्ये सुरू झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला अगोदरच अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवाईदलालाही सज्जतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारताचे
लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट देत स्थितीचा आढावा घेतला असून त्यासंदर्भातील अहवाल तयार करून तो पंतप्रधान कार्यालयाला पाठवला जाणार आहे. सूत्रांच्या
म्हणण्यानुसार चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषचे उल्लंघन अचानक केलेले नाही. तर याबाबत त्यांनी अगोदरच पाकिस्तानसोबत रणनिती तयार केली असावी. गेल्या महिन्यात म्हणजे मे मध्ये चीनने लडाखमध्ये हालचाली सुरू केल्या तेव्हा त्याचवेळी त्यांच्या अधिकाऱ्यांचा एक गट पाकव्याप्त काश्मिरात दहा ते बारा दिवस मुक्कामी होता. त्यांनी पाकिस्तानी चौक्यांना आणि काही दहशतवादी गटांच्या शिबिरांनाही भेटदिल्या होत्या. त्या काळात व्याप्त काश्मिरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली जाण्याची खबरदारीही घेण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांत भारतीय दिशेने अचानक गोळीबार आणि गोळाबारी सुरू झाली होती,
ती याच भागातून करण्यात आली होती. याचा अर्थ मे महिना किंवा त्याच्याही अगोदरपासून भारताविरोधात कारस्थान रचले जात होते. त्यात चीनबरोबर पाकही सहभागी होता. ही अत्यंत सुनियोजित मोहिम आखण्यात आली होती.
पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीही सहा दिवसांपूर्वी व्याप्त काश्मिरातील रूग्णांलयातील 50 टक्के बेड सैनिकांसाठी मोकळे ठेवण्याची सूचना तेथील आरोग्यमंत्र्यांना केली आहे. खंडवारी,रहिम यारखान आणि सक्खर हे पाकचे तीन हवाईतळही सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. लष्करी विमानांचा सराव ही नियमित बाब असते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यात नियमितपेक्षा वेगळे काहीसुरू असल्याचे संकेत मिळत आहेत, असेही सूत्रांनी नमूद केले.