आता हरियाणा आणि तेलंगणाला देखील ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसची सेवा

नवी दिल्ली, दि. 29 – महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीनंतर आता ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसची सेवा हरियाणा आणि तेलंगणा पर्यंत विस्तारित झाल्याने राज्यांना दिलासा मिळत आहे. ही सेवा अशीच अखंड सुरु ठेवण्यासाठी आणखी तीन गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे, या गाड्या द्रवरूपी ऑक्‍सिजन घेऊन जात आहेत किंवा ऑक्‍सिजन भरणा केंद्रांच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. भारतीय रेल्वेने वाहून नेलेले द्रवरूपी वैद्यकीय ऑक्‍सिजन पुढील 24 तासांत एकूण 640 मेट्रिक टनावर पोहोचेल.

5 टॅंकरमध्ये 76.29 मेट्रिक टन द्रवरूपी वैद्यकीय ऑक्‍सिजन असलेली पाचवी ऑक्‍सिजन एक्‍सप्रेस आज उत्तरप्रदेशला पोहोचली. अंगुल (ओडिशा) येथून दोन टॅंकरसह ऑक्‍सिजन एक्‍सप्रेस रवाना झाल्याने आज हरियाणाला पहिली ऑक्‍सिजन एक्‍सप्रेस पोहोचणार आहे. रिकामे टॅंकर फरीदाबाद ते राउरकेला आज रात्री पोहोचण्याची अपेक्षा आहे. तेलंगणा सरकारनेही रेल्वेला ऑक्‍सिजन एक्‍सप्रेस पाठवण्याची विनंती केली आहे.

आवश्‍यक कळवणाऱ्या सर्व राज्यांना ऑक्‍सिजन वाहतूक सेवा देण्यासाठी रेल्वे सज्ज आहे. सध्या सुरू असलेल्या या ऑक्‍सिजन पुरवठा प्रक्रियेत राज्ये रेल्वेला टॅंकर पुरवत आहेत. त्यानंतर ऑक्‍सिजन निर्मिती केंद्रांमधून ऑक्‍सिजन घेऊन तो आवश्‍यक असलेल्या राज्यांना पुरविण्यासाठी रेल्वे आवश्‍यक त्या जलद मार्गाचा अवलंब करत आहे. द्रवरूपी ऑक्‍सिजन हा क्रायोजेनिक असल्याने याची वाहतुक करणे जिकीरीचे असल्याने त्यावर बऱ्याच मर्यादा आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.