अहमदाबाद, दि.29 – महाराष्ट्रासह विविध राज्यांत पुरेशा करोना लसींअभावी लसीकरणाचा पुढील टप्पा रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असणाऱ्या गुजरातमध्येही त्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
देशात लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मे पासून सुरू होणार आहे. त्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थींना लस दिली जाणार आहे. मात्र, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अनेक राज्यांत लसीकरणाचा पुढील टप्पा वेळेत सुरू होण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला गुजरात राज्यही अपवाद ठरलेले नाही.
पुढील टप्प्यातील लाभार्थींना मोफत लस पुरवण्याची घोषणा गुजरात सरकारने याआधीच केली आहे. त्या टप्प्यासाठी सज्ज होत गुजरातने 25 एप्रिलला लसींच्या ऑर्डर्स दिल्या. त्यानुसार, सीरम इन्स्टिट्यूटकडून 1 कोटी कोविशिल्ड लसी, तर भारत बायोटेककडून 50 लाख कोव्हॅक्सिन लसी मागवण्यात आल्या आहेत. त्या वेळेत मिळण्याची गुजरातला प्रतीक्षा आहे. त्यामुळे गुजरात मुहूर्त साधणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.