डेहराडून, दि. 29- करोनाचा वेगाने प्रसार होत असताना कुंभमेळा आयोजित करण्याची गरजच काय होती यावरून ओरड सुरू असताना आता खबदारीचा उपाय म्हणून पुढच्या महिन्यात सुरू होणारी चारधाम यात्रा स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी गुरुवारी डेहराडून येथे पत्रकारांशी संवाद साधला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चारधाम तिर्थ यात्रा करणे शक्य नाही. त्यामुळे यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु हिमालयीन तीर्थक्षेत्रांचे दार ठरलेल्या तारखेनुसार उघडतील. पुरोहित वर्ग नियमित पूजा करतील असे रावत यांनी म्हटले आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणे उत्तराखंडमध्ये करोना संसर्गाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत उत्तराखंडमध्ये 6 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले आहे. 14 मे रोजी अक्षयतृतीयाच्या पवित्र दिवशी उत्तर काशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे द्वार उघडले जातील. तसेच रुद्र प्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ मंदिराचे द्वार 17 मे रोजी तर, बद्रीनाथ मंदिराचे द्वार 18 मे रोजी उघडण्यात येणार आहे.