350 मेट्रिक टनाची मागणी 280 मेट्रिक टन वर
पुणे – पुणे विभागातील करोना बाधितांची संख्या घटली, त्याचबरोबर अत्यवस्थ बाधितांची संख्याही झपाट्याने खाली येत आहे. त्यामुळे पुणे शहरासह विभागात सप्टेंबर महिन्यात ऑक्सिजनच्या असलेल्या मागणीतही घट झाली आहे.
350 मेट्रिक टनाची मागणी आता 280 मेट्रिक टनापर्यंत खाली आली असून, जवळपास 25 टक्क्यांनी ही मागणी घटली आहे. त्यामध्ये पहिल्या दिवसांपासून पुणे शहरातील वाढलेली ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे.
सद्यस्थितीत पुणे शहरात ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या साडेतीन हजारावरून 2 हजार 501 पर्यंत खाली आली आहे. एक हजारावरून गंभीर रुग्णांची संख्या 833 पर्यंत खाली आली आहे. त्यात सक्रिय रुग्णांची संख्याही 11 हजार 746 पर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी घटली आहे.
शहरात 24 टक्क्यांनी मागणी घटली
पुणे शहरात कालपर्यंत 230 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनची मागणी होती. मात्र, आता या मागणीत घट झाली असून, सध्या 180 मेट्रीक टन मागणी आहे. पुणे विभागात सर्वाधिक सातारा जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी घटली आहे. त्यानंतर सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यात 22 टक्क्यांनी मागणी घटली आहे.