देशविदेश : उत्तर कोरियाचे दबावतंत्र

स्वप्निल श्रोत्री

एखाद्या राष्ट्रावर आर्थिक निर्बंध लावून ते आपली गोष्ट मानेल असे समजणे चुकीचे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तर कोरियावर अमेरिकेचे निर्बंध आहेत, तरी उत्तर कोरियावर त्याचा कसलाही परिणाम झालेला नाही.

अमेरिकेने जेव्हापासून अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला आहे तेव्हापासून उत्तर कोरियातील अण्वस्त्र संबंधित हालचालींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ज्या पद्धतीने अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला आणि तालिबानने ज्या वेगाने अफगाणिस्तानची सत्ता बळकाविली. त्यामुळे संपूर्ण जगभरात अमेरिकेची निंदा झाली त्याचा फायदा मागील दोन महिन्यांत अनेकांनी घेतल्याचे दिसून येते. उत्तर कोरिया हे राष्ट्र त्यापैकीच एक होय.

उत्तर कोरिया हे जगातील अशा राष्ट्रांपैकी एक आहे जेथे प्रत्येक बाबींवर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे अशा राष्ट्रांच्या आत काय चालले आहे त्याची माहिती मिळणे कठीण असते. 2019 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा त्याबदल्यात अमेरिका उत्तर कोरियावर लावलेले आर्थिक निर्बंध मागे घेईल, असे ठरले होते. 

सदर बैठकीचा मूळ अजेंडा हा असल्यामुळे जेव्हा दोन्ही नेते एकत्र आले तेव्हा काहीतरी ऐतिहासिक होईल अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात होती; परंतु मूळ बैठक ही दोघांपैकी पहिले कोण करणार या कारणामुळे पूर्णत्वास गेली नाही. अमेरिकेची अपेक्षा अशी होती किंबहुना आजही आहे की, उत्तर कोरियाने सर्वप्रथम आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत मग अमेरिका आपले निर्बंध मागे घेईल. वास्तविक पाहता अमेरिकेची अपेक्षा ही वास्तवाला धरून नाही. 

अण्वस्त्रे ही उत्तर कोरियाचा हुकमी एक्‍का आहे. त्यामुळे जर उत्तर कोरियाने सर्वप्रथम आपली अण्वस्त्रे नष्ट केली तर अमेरिका उत्तर कोरियावरील निर्बंध मागे घेईल याची खात्री काय? आणि उत्तर कोरियाची अण्वस्त्रे नष्ट झाल्यावर अमेरिका उत्तर कोरियावर लष्करी हल्ला करणार नाही याची शक्‍यता नाकारता येत नाही.

अमेरिका हे बेभरवशाचे राष्ट्र आहे. करारात ठरल्याप्रमाणे प्रामाणिकपणे कराराची अंमलबजावणी करणाऱ्या इराणला ज्याप्रकारची वागणूक अमेरिकेने (ट्रम्प प्रशासनाने) दिली ती पाहता अमेरिकेच्या शब्दावर कितपत विश्‍वास ठेवावा हा चिंतनाचा विषय आहे. त्यामुळेच उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट न करता त्यात वाढ केल्याचे दिसून येते.

जपान आणि दक्षिण कोरिया रडारवर

उत्तर कोरियाचे जपान आणि दक्षिण कोरियाशी असलेले वैर हे सर्वश्रुत आहे. उत्तर कोरियाने चाचणीदरम्यान आपली अण्वस्त्रे ही जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात पाडल्याची गेल्या 3 वर्षांत अनेक उदाहरणे आहेत. जपान, दक्षिण कोरिया आणि परिसरातील छोटे मोठे बेट हे उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे कायमच दहशतीखाली असतात. उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन ह्यांचा बौद्धिक आणि वैचारिक पातळीशी कसलाही संबंध नसल्यामुळे ते कधी काय करतील याचा कसलाही नेम नाही. उत्तर कोरियाच्या आक्रमक आणि हेकेखोर स्वभावामुळे कोरियन द्विकल्पातील राजकीय परिस्थितीही अधिक गडद झालेली आहे.

अण्वस्त्रे निर्मितीचा कार्यक्रम सुरूच

उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या पुन्हा एकदा सुरू केल्याने उत्तर कोरिया आणि त्याचे शासक किम जोंग उन हे चर्चेत आले आहेत. परंतु, याचा अर्थ असा नाही की, मागील दोन वर्षात उत्तर कोरियात अण्वस्त्रे निर्मिती झालीच नाही. उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्रे निर्मितीचा कार्यक्रम हा कधीच थांबविला नव्हता. स्टॉकहोम इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड रिसर्च अर्थात सिप्रीच्या 2018-2019 च्या अहवालानुसार उत्तर कोरियाकडे अंदाजे 30 ते 40 अण्वस्त्रे असल्याचे सांगितले होते. 2020-2021 च्या अहवालात हा आकडा 40 ते 50 पर्यंत गेला आहे. अर्थात, मागील 2 वर्षात उत्तर कोरियाच्या शस्त्रभंडारात 10 अण्वस्त्रांची वाढ झालेली आहे. करोना महामारीच्या काळातसुद्धा उत्तर कोरियात अण्वस्त्रे निर्मितीचा कार्यक्रम व्यवस्थित सुरू होता.

गरजेपेक्षा जास्त अण्वस्त्रे धोकादायक

अण्वस्त्रे हे जागतिक अतिसंहारक शस्त्रांपैकी एक आहे. ज्या राष्ट्राकडे अण्वस्त्रे आहेत त्या राष्ट्राच्या वाट्याला जाण्यास सहसा कोणी धजावत नाही. अण्वस्त्रे ही अनेकदा शत्रू राष्ट्रात भीती दाखवण्यासाठी वापरली जातात. परंतु, आपलीच अण्वस्त्रे अनेकदा आपल्यासाठीच धोकादायक ठरण्याची शक्‍यतासुद्धा अधिक असते. युद्धाच्या काळात टोकाच्या परिस्थितीत अण्वस्त्रधारी राष्ट्रावर पूर्ण शक्‍तीनिशी भयंकर हल्ला केला जातो. त्याचे कारण असे असते की, शत्रू राष्ट्र पुन्हा प्रतिहल्ला करण्यासाठी उभे राहूच नये. कारण प्रतिहल्ला हा अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे आपल्या पहिल्याच हल्ल्यात शत्रू राष्ट्राची सर्व अण्वस्त्रे नष्ट करण्याचा इतर राष्ट्रांचा प्रयत्न असतो.

उत्तर कोरियाकडे फार मोठी जमीन किंवा मोठे भौगोलिक क्षेत्रफळ नाही. कोणतेही राष्ट्र आपली अण्वस्त्रे एका ठिकाणी लपवून ठेवत नाही. देशाच्या विविध भागात, विविध ठिकाणी योग्य अंतर राखून ठेवावी लागतात. उत्तर कोरियाकडे 40 ते 50 अण्वस्त्रे लपवण्यासाठी जमीनच नाही. त्यामुळे युद्धाच्या परिस्थितीत शत्रू राष्ट्राचा साधा हल्लासुद्धा उत्तर कोरियाचे कोणते ना कोणते अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी पुरेसा आहे.

अण्वस्त्रे नष्ट होणे म्हणजे आपल्याच अण्वस्त्राचा आपल्याच जमिनीवर स्फोट होणे होय. अशा परिस्थितीत काय परिणाम होतील हे सर्व जगाला माहीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात बिघडलेली परिस्थिती बायडेन यांनी सुधारणे गरजेचे आहे. एक पाऊल अमेरिकेने मागे घ्यावे, एक पाऊल उत्तर कोरिया मागे येईल. पहिले तू… पहिले तू… करण्याच्या नादात दोन्ही राष्ट्रांचे नुकसान तर होईलच पण त्याचे परिणाम निर्दोष जनतेलाही भोगावे लागतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.