पळसदेव- जगभरात करोना रोगाचा अधिक प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे जनतेला काही दिवस सामाजिक एकत्रीकरण टाळण्याचे आवाहन सरकारच्या वतीने केले आहे. तरीदेखील नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. त्यातच करोनाचा रुग्ण बारामतीमध्ये आढळून आल्याने इंदापूर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याचाच एक भाग म्हणून इंदापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बिजवडी येथील नागरिकांनी बाहेरील नागरिक गावात येऊ नये म्हणून गावात येणारा मुख्य रास्ता बंद केला आहे.
गावाबाहेरील कोणताही नागरिक गावात येऊ नये व गावातील कोणी बाहेर जाऊ नये, यासाठी गावात येणारा मुख्य रास्ता दगड व काट्या टाकून बंद करण्यात आला आहे. करोनाच्या भीतीने नागरिकांनी घराबाहेर पडू नये व गावातही कोणी येऊ नये, यासाठी नागरिकांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.