वेल्हे- मोसे बुद्रुक (ता. वेल्हे) येथील 35 कातकरी बांधवांना मोफत किराणा वाटप करण्यात आला आहे. मोसे बुद्रुक व सांडवघर येथील कातकरी बांधवांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पानशेत परिसरातील उद्योग धंदे पूर्ण ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. उपासमारीची समस्या भीषण होऊ नये, यासाठी वेल्हे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेक हात मदतीला आले आहेत.
उद्योजक फारूख माहावास यांनी प्रत्येक कुटुंबाला किराणा माल देत पस्तीस घरांची भूक भागवली आहे. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर वाटप केले. यावेळी तहसीलदार शिवाजी शिंदे, पानशेत मंडल अधिकारी विकास पाटील, तलाठी महेश माने, परमेश्वर जाधव, रविकिरण पाटील, सुशीला मोरे, संजय चोरघे, माजी सरपंच बबन मरगळे, बाळू पासलकर, पोलीस पाटील आपर्णा चोरघे, सरपंच सारिका पासलकर, संपत पवार यावेळी उपस्थित होते.