भीमाशंकर कारखान्याचे कर्मचारी शेताच्या बांधावर, पाण्यातून ऑइलचा वापर
रांजणी -आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील साकोरे, महाळुंगे, नांदुर, लौकी, थोरांदळे, जाधववाडी, वडगाव काशिंबेग आदी भागांत सुमारे 150 हेक्टर उसाच्या पिकाला हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. हुमणी नियंत्रण करण्यासाठी महागडी औषधे वापरावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
भीमाशंकर कारखान्याचे अधिकारी संजय थोरात, दिगंबर दरेकर, सचिन सैद शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. कारखान्याकडून हुमणी नियंत्रण करण्यासाठी मांजरी-पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेली बीव्हीएम औषधे ऊस उत्पादकांना अल्प दरात उधारीवर वाटप करण्यात येत आहेत. गाडेपट्टी-साकोरे (ता. आंबेगाव) येथे नव्याने लागवड झालेल्या उसाला हुमणी किडीने रोपे खोडव्यात कुरतडली जात आहेत. शेतात रोपांची संख्या कमी झाल्याने पुन्हा नवीन रोपांनी सांधणी करावी लागत आहे. त्यामुळे लागवड खर्चात वाढ होत आहे.
हुतात्मा बाबू गेणू जलाशयाच्या लाभक्षेत्रात पाणीसाठा बारमाही मुबलक असल्याने या परिसरात मोठया प्रमाणात ऊस या नगदी पिकाची लागवड प्रतिवर्षी होत असते. यंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. हुमणीच्या प्रादुर्भावासाठी जुलै, ऑगस्ट महिन्यांत वातावरण पोषक ठरत आहे. हलक्या प्रतीच्या भुरकट जमिनीत हुमणीचे प्रमाण मोठे असल्याचे चित्र दिसत आहे. चिवट व खारवट जमिनीत हे प्रमाण कमी आहे. याच महिन्यात थुईथुई पाऊस पडत होता.
- यंदा आतापर्यंत तरी पावसाचे प्रमाण कमी आहे. जमीन वरून ओली दिसत असली तरी जमिनीला मोठ्या प्रमाणात उष्णता आहे. त्यात शेणखतांचा वापर करण्यात आल्याने हुमणीची वाढ झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागवड केल्यानंतर लगेचच पंपाद्वारे हुमणी नियंत्रण करणाऱ्या औषधांची सरीत आळवणी करावी.
-दिगंबर दरेकर, शेतकी अधिकारी भीमाशंकर कारखाना - हुमणीसाठी अल्पखर्चाचा पारंपरिक उपाय
जळके खराब ऑइल प्रति एकर दोन लिटर पाण्यातून सोडल्यास हुमणी नियंत्रण होते, असे उस उत्पादक शेतकऱ्यांचे ठाम मत आहे.