करोना विषाणूंमुळे देशात लॉकडाऊन सुरू असून सर्व चित्रपटांचे शूटिंग आणि थिएटर बंद आहेत. अशा परिस्थितीत अनेक बिग बजेट चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता अक्षय कुमारचा हॉरर-कॉमेडी “लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट जूनमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी “लक्ष्मी बॉम्ब’चे डिजिटल प्रीमियर करण्याचे निश्चित केले आहे. याबाबत तीन आठवड्यांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाशी संबंधित लोकांना असे वाटतेय की सप्टेंबरपूर्वी थिएटर्स सुरू होण्याची अपेक्षा नाही. अशा परिस्थितीत बिग बजेट चित्रपटांचे नुकसान होईल.
अक्षय कुमारचा “लक्ष्मी बॉम्ब’ हा तमिळ सुपरहिट “मुनी 2: कांचना’चा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी, अश्विनी कळसेकर, तुषार कपूर, शरण केळकर मुख्य भूमिकेत आहेत.
दरम्यान, एखाद्या बिग बजेट चित्रपटाचे डिजिटल प्रीमियर होण्याची ही पहिलीच घटना आहे. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, मल्टीप्लेक्स आणि थिएटरचे मालक ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठे चित्रपट रिलीज होणार असल्याने नाराज आहेत. यावेळी त्यांनी चित्रपट निर्माते व कलाकारांना आवाहन केले की या संकटाच्या वेळी आम्हाला सहकार्य करावे आणि ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करू नयेत.