समन्यायी पाणी वाटप परिषदचे वडुज येथे आयोजन

श्रमिक मुक्ती दलाचा पुढाकार : खा. उदयनराजे राहणार उपस्थित

सातारा- जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कुटुंबाच्या पाच एकरांसाठी खात्रीपूर्वक पाणी मिळविण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने वडुज (ता. खटाव) येथे समन्यायी पाणी वाटप परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे परिषद होणार असून यावेळी खा. उदयनराजे व डॉ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती चैतन्य दळवी यांनी दिली.

श्रमिक मुक्‍ती दलाच्या 30 वर्षाच्या संघर्षानंतर सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्‍यात सार्वत्रिक पध्दतीच्या बंद पाईपमधून समन्यायी पाणी वाटपाचा आणि एकात्मिक पाणी वापराचा देशातील पहिला प्रकल्प अंमलात आणला जात आहे. यामुळे मुळ आखणीमध्ये पाणी मिळण्यापासून वगळलेल्या गावांनाच नव्हे तर लाभक्षेत्रातील गावांमध्येही पाणी मिळण्यापासून वगळलेल्या सर्व कुटुंबाना प्रत्येकी 5 हजार घनमीटर पाणी दरवर्षी खात्रीपूर्वक मिळणार आहे. प्रत्येक कुटुंबातील किमान पाच एकरातील बागायती शेती करता येणार आहे. हा आटपाडी पॅटर्न सर्व तालुक्‍यांमध्ये राबविण्यात यावा, अशी मागणी घेवून गेली तीन वर्ष संघर्ष चालू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाने पाठींबा देताना डॉ. भारत पाटणकर व खा. उदयनराजे भोसले यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये समन्यायी पाणी वाटपाचा पॅटर्न राबविण्याकरिता जनसंघर्ष उभा करण्याची बांधिलकी खा. उदयनराजे यांनी स्विकारली होती.

त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून वडुज येथे जनतेची लढा परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत पाणी कसे मिळू शकते याचा हिशोब मांडण्यात येणार आहे. लाभक्षेत्रातून वगळलेल्या गावांना आणि लाभक्षेत्रात समावेश असून ही पाण्याचा लाभ न मिळणाऱ्या गावांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी परिषदेला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दळवी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.