“मियावाकी’पेक्षा भारतीय “निसर्गबेट’च चांगले

पर्यावरणप्रेमींचे मत : दूरगामी फायद्यांबद्दल साशंकता

पुणे – “प्रचंड खर्च, ठराविक प्रकारच्या वनस्पती, दूरगामी फायद्यांबद्दल असलेली साशंकता आणि भावनात्मकरीत्या जोडले जाण्याचा अभाव अशा विविध कारणांमुळे “मियावाकी’ ही जापानी वृक्षलागवड पद्धत भारतात राबविणे चुकीचे ठरेल. याउलट गावशिवारात ठराविक आकाराची जागा ठरवून, पाणलोट क्षेत्रानुसार सुयोग्य जलसंरचना व स्थानिक जातींच्या वनीकरणातून जंगलनिर्माण याचे आदर्श मिश्रण म्हणजेच निसर्गबेट हे भारतात कुठेही सहजरीत्या राबविता येऊ शकते. त्यामुळे जापानी “मियावाकी’पेक्षा भारतीय निसर्गबेट या संकल्पनेला अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आले.

चंद्रपूर येथे “मियावाकी’ जंगल पद्धतीने वृक्षारोपण केल्यानंतर राज्यात इतर ठिकाणीदेखील ही पद्धत राबवून वृक्षारोपण करण्याचा विचार वनविभागातर्फे केला जात आहे. मात्र, या पद्धतीबाबत पर्यावरणप्रेमींकडून विविध प्रश्‍न उपस्थित करत, भारतीय लागवड पद्धतीला प्रोत्साहन देण्याबाबत मागणी केली जात आहे.

याबाबत पर्यावरण अभ्यासक उपेंद्र धोंडे म्हणाले, “आपल्याला सामान्यांनाही सहजशक्‍य, निसर्गाप्रती आदर निर्माण करणारी व जीवनशैलीचा भाग असणारी परंपरा हवी आहे जी हवामान, भूरूपे आणि स्थानिक जीवनपद्धतीनुसार गरजांची पूर्ती करेल. विशेष म्हणजे आपल्याकडे ती आहे. मात्र, शासनामध्ये स्थानिक उपाययोजनांबद्दल असलेला माहितीचा अभाव व उदासीनता यामुळेच “मियावाकी’सारख्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे.”मियावाकी’ हा गुंतवणूक-फायदा-तोटा पाहणारा व्यवसाय असून, प्रचंड खर्चिक तसेच यात अशी कृत्रिम तंत्र-साधनांची आवश्‍यकता असते. देवराईत मोठा खर्च गरजेचा नाही आणि भावनात्मकता असल्याने अंमलबजावणीत संपूर्ण तंत्राचे पालन आणि अंमलबजावणीनंतर संरक्षण दोन्ही शक्‍य आहे. शिवाय यामध्ये जशी जागा तसा पर्याय आहे. पंचवटी, नक्षत्रवटी, वनराई, ग्रामबन, सप्तर्षीवन, शिव पंचायतन, स्मृतीवन, कुरण, जैवइंधन वन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय मानसिकता, तज्ञ-अभ्यासकांचा सहभाग, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि शासकीय मदत या गोष्टींच्या माध्यमातून कमी खर्चात अतिशय सुंदर आणि शाश्‍वत स्वरूपाचे हरितक्षेत्र निर्मिती करता येईल.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)