हडपसर – सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट पुणे (एसएपी) यांच्यावतीने या वर्षी आयसए कॉन २०२३ महाराष्ट्र राज्य भूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ही परिषद असून ज्यात महाराष्ट्र राज्य आणि आसपासच्या सुमारे १२०० प्रतिनिधींचा सहभाग आहे. अशी माहिती परिषदेचे आयोजन अध्यक्ष , नोबल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक व वरिष्ठ सल्लागार तसेच ऍनेस्थेसियोलॉजी विभाग प्रमुख डॉ. एच.के.साळे यांनी दिली.
ऍनेस्थेसियोलॉजिस्ट पुणे या सोसायटी व परिषदेविषयी अधिक माहिती देताना डॉ.एच.के. साळे म्हणाले की, या सोसायटीची स्थापना १९७० मध्ये झाली आहे. पुणे शहर आणि उपनगरातील भूलतज्ज्ञांना एकत्र येण्यासाठी आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी आणि भूलशास्त्राच्या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश या सोसायटीचा आहे.ही सोसायटी भूलतज्ज्ञांसाठी शैक्षणिक मासिक बैठका, नियमित शैक्षणिक अभ्यासक्रम आणि कार्यशाळा आयोजित करत असते.
जेणेकरुन ऍनेस्थेसिया प्रॅक्टिस आणि संशोधनातील नवीनतम घडामोडींची माहिती व्हावी. तसेच ही सोसायटी ऍनेस्थेसियाबद्दल सार्वजनिक जागरूकता आणि आरोग्य सेवेमध्ये भूलतज्ज्ञांची महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट करण्यासाठी देखील कार्य करत आहे. जे कोविड महामारीदरम्यान अधिक प्रकर्षाने ध्यानात आले. या वर्षी पुणे शहर शाखा (एसएपी) राज्य परिषद, आयसए कॉन महाराष्ट्र २०२३ पुणे आयोजित करत आहे. ज्यात महाराष्ट्र राज्य आणि आसपासच्या सुमारे १००० ते १२०० प्रतिनिधींचा सहभाग आहे.
या परिषदेदरम्यान शहरातील विविध रुग्णालयांमध्ये विशेषतः तरुण आणि नवोदित भूलतज्ज्ञ आणि स्वतंत्ररित्या प्रॅक्टिस करणारे भूलतज्ज्ञ यांना लक्षात घेऊन परिषदपूर्व कार्यशाळा होतील. वैज्ञानिक कार्यक्रम विचारपूर्वक निवड व संयोजन करून तज्ज्ञवर्ग, समस्या आधारित शिक्षणविषय, सर्वसमावेशक पूर्णसत्रे, तज्ज्ञांबरोबर भेटसत्रे, प्रत्येक सत्रात प्रेक्षकांचा सहभाग आणि प्रश्नोत्तर संवाद या सर्व बाबी विशेष विचारात घेऊन काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक ठरवलेले आहेत. असेही डॉ.साळे यांनी सांगितले.
“एकमेकांच्या सहयोग,सहकार्य व सहभागाने एकत्रितरित्या काम करू.”
गेल्या तीन वर्षात, साथीच्या रोगाने वैद्यकीय समाजाला व्यापून टाकले होते. परिणामी सर्व भूलतज्ज्ञांमध्ये एक अपरिहार्य दरी आणि अंतर निर्माण झाले. ही दरी भरुन काढण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य विद्याशाखांशी संवाद साधण्यास आणि चर्चासत्रे घडवून आणण्यास ही वार्षिक राज्य परिषद उत्तम संधी प्रदान करेल. या परिषदेचे घोषवाक्य आहे. “एकमेकांच्या सहयोग, सहकार्य व सहभागाने एकत्रितरित्या काम करू.” – डॉ.एच.के.साळे, आयोजन अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य भूल परिषद २०२३.