पुणे – उपचारादरम्यान ब्रेनडेड झालेल्या 19 वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांनी धाडसी निर्णय घेत, त्याच्या अवयवदानाला संमती दिली. यामुळे पाच गरजूंना अवयव उपलब्ध झाले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि पुण्यातील ऑर्गन ट्रान्सप्लान्ट सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये एकाच दिवशी या सर्व अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना तरुणाची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले.
तरुणाच्या कुटुंबियांच्या संमतीनंतर प्रत्यारोपण प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. या शस्त्रक्रियेत 52 वर्षीय पुरुषाला हृदय, 39 वर्षीय महिलेला फुफ्फुस, 53 वर्षीय पुरुषाला यकृत, 35 वर्षीय पुरुषाला किडनी आणि स्वादुपिंड तर 47 वर्षीय पुरुषाला किडनी देऊन अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. किडनी, यकृत आणि स्वादुपिंडाच्या प्रत्यारोपणासाठी असलेल्या पथकाचे नेतृत्व “मल्टी ऑर्गन स्पेशालिस्ट’ डॉ. वृषाली पाटील यांनी केले. हृदय आणि फुफ्फुसांचे प्रत्यारोपण कार्डिओथेरॉकिक सर्जन डॉ. संदीप अट्टावर यांच्या नेतृत्वाखाली झाले, अशी माहिती हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील
यांनी दिली.
1954 मध्ये पहिले अवयवदान
जगातील पहिले यशस्वी अवयवदान 1954 मध्ये अमेरिकेत करण्यात आले. रोनाल्ड ली हेरिक नावाच्या व्यक्तीने 1954 साली त्याच्या जुळ्या भावाला त्याची एक किडनी दान केली होती. डॉ.जोसेफ मरे यांनी पहिल्यांदाच त्यांचे किडनी प्रत्यारोपण केले. ज्यासाठी डॉ. जोसेफ मरे यांना 1990 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले.
अवयवदानाचे महत्त्व
अवयवदानाचा मुख्य उद्देश गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचवणे हा आहे. एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात अवयवदानाची भूमिका महत्त्वाची असते. अवयवदानाच्या क्षेत्रात सुधारणा करून वैद्यकीय शास्त्राने अनेक गैरसमज दूर केले आहेत. आता कोणत्याही वयाची व्यक्ती आपले अवयव दान करू शकते. सध्याच्या काळात लोक अवयवदानाबद्दल खूप जागरूक झाले आहेत आणि त्याचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत.