पुणे – राज्यातील 1 हजार 192 अर्धवेळ ग्रंथपालाना पूर्णवेळ करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे. यामुळे अर्धवेळ ग्रंथपालाना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळांमधील निकष पूर्ण करणाऱ्या अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळपदी संधी मिळावी यासाठी लोकप्रतिनिधी व विविध संघटनांकडून मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात आली असून मंजुरी मिंळालेली आहे. राज्यामध्ये पूर्णवेळ ग्रंथपालाची एकूण 2 हजार 118 मंजूर पदे आहेत.
सद्यस्थितीत ग्रंथपालाची पूर्णवेळ कार्यरत पदे 926 आहेत. उर्वरित ग्रंथपालाची पदे अर्धवेळच आहेत. राज्यात सध्या 2000 ते 3,000 इतकी विद्यार्थी संख्या असलेल्या सर्वसाधारण शाळा 280 असून त्यावर अधिक 280 पूर्णवेळ ग्रंथपालांना कार्यभार मंजूर होणार आहे. 300 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या 53 शाळा आहेत. त्यामध्ये 106 पूर्णवेळ ग्रंथपालाचा कार्यभार मंजूर होणार आहे. यातून 386 पूर्णवेळ ग्रंथपालांचा कार्यभार मंजूर होणार आहे. दोन व तीन शाळा एकत्रित करुन शाळा मॅपिंग अहवालानुसार 1001 विद्यार्थी संख्येचा निकष पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पदांवर अर्धवेळ ग्रंथपालाचे रुपांतरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.