मुंबई – मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उपचारासाठी सुमारे 15 हजार डॉक्टरांची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत यापुढे शासकीय कर्मचारी, पांढरे रेशन कार्डमधील लोक कोविड असो की नॉन कोविड असो सर्वांना यात वैद्यकीय सुविधा मिळणार आहे.
खासगी रुग्णालयात जरी उपचार केला तरी त्याचे पैसे सरकार भरणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील जनतेसाठी राज्य सरकार 1500 कोटी रुपये उतकी रक्कम इन्शुरन्ससाठी भरत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
खासगी डॉक्टरांनी 15 दिवस कोविड-19 चे रुग्ण असलेल्या रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी, असे आवाहन वैद्यकिय शिक्षण-संशोधन मंडळ संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.
दरम्यान, महापालिकेने वारंवार आवाहन करुनही अनेक खासगी डॉक्टर्सने आपले दवाखाने, नर्सिंग होन सुरु ठेवलेले नाहीत. त्यामुळे मान्यताप्राप्त आणि पदवीधारक डॉक्टरांनी कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते.