पिंपरी – ‘जल्लोष शिक्षणाचा पर्व -२‘ हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांच्या समन्वयातून काम करावे, कार्यक्रमात उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांना कोणत्याही सोयीसुविधांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांचे यश साजरे करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जल्लोष शिक्षणाचा पर्व – २’ या कार्यक्रमाचे आयोजन २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. आयोजनाची आढावा बैझाठक बुधवारी (दि. १७) महापालिके झाली. बैठकीस उपायुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
‘जल्लोष शिक्षणाचा पर्व -२’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, पालकांसाठी योग्य त्या सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम महापालिका शाळांमधील महत्वाचा घटक तसेच शिक्षणाचा उत्सव आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांच्या यशाचे आणि आकांक्षांचे साक्षीदार होण्याची ही संधी आहे. त्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय राहण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करावे, असेही जांभळे पाटील म्हणाले.
उत्कृष्ट शाळांचा होणार सन्मान
‘जल्लोष शिक्षणाचा पर्व -२’ हा कार्यक्रम सर्व १२८ महापालिका शाळांमध्ये दोन महिने चाललेल्या शैक्षणिक उत्सवाचा समारोप असणार आहे. विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता तसेच शिक्षकांच्या नवकल्पना साजरा करणे, हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. शैक्षणिक उत्कृष्टता, शालेय संस्कृती, तंत्रज्ञान एकात्मता, पालक आणि समुदाय सहभाग तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अशा विविध पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना सन्मानित केले जाणार आहे.