पुणे – राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता 65 झाल्याने ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत तेथे कडक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सुमारे 17 जिल्ह्यांमध्ये मिळून हे 65 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.
जिनोमिक सिक्वेन्सिंग मधून हे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडट्रियल रीसर्च संस्थें’तर्गत काम करणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी’ या प्रयोगशाळेत ही तपासणी करण्यात आली आहे.
त्यातून पाच जिल्ह्यांमध्ये नव्याने या व्हेरीयंट चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागात उपाययोजना करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
या सगळ्या भागात सापडलेल्या रुग्णांनी जर प्रवास केला असेल तर त्याचा इतिहास, त्यांच्या आजाराचे स्वरूप याची सविस्तर माहिती घेणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कोणाला लक्षणे आढळले असल्यास त्याचे नमुने घेणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
“फ्लू आणि सारी’ आजाराचेही सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अनेक रुग्णांना दुसऱ्यांदा संसर्ग होत असल्याचे दिसून आले आहे, अशा रुग्णांचा शोध घेऊन त्याचे पुन्हा नमुने घेणे, तसेच लसीकरणानंतरही करोनाची बाधा झाल्यास त्या रुग्णाचे ही नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.