पुणे -श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे साबुदाणाला मागणी वाढते. परिणामी काही प्रमाणात भावातही वाढ होते. मात्र, यावेळी श्रावण महिना सुरू झाला तरी साबुदाणाला ग्राहकांकडून मागणी वाढली नाही.
त्यामुळे साबुदाणाच्या क्विंटलच्या भावात 50 ते 100 रुपयांनी घट झाली आहे. घाऊक बाजारात मध्यम साबुदाणाचा किलोचा भाव 47 ते 50, तर चांगल्या प्रतिच्या साबुदाणाचा किलोचा भाव 51 ते 53 रुपये असल्याची माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
बाजारात होणारी शेंगदाणाची आवक थांबली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत शेंगदाणा कमी असल्याने क्विंटलच्या भावात 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. गणेशोत्सवापर्यंत ही वाढ कायम राहणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले.
ते म्हणाले, मार्केट यार्डातील भुसार विभागात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि बिहार येथूनही शेंगदाणाची आवक होते. मात्र, बिहार आणि मध्य प्रदेशातील आवक पूर्णत: थांबली आहे. तर, गुजरात येथील माल संपला आहे. त्यामुळे बाजारात शेंगदाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे.