दिल्ली उच्च न्यायालयाकडून “स्यू मोटो’ प्रकरण दाखल
नवी दिल्ली: तीस हजारी कोर्टाच्या आवारामध्ये वकील आणि पोलिस यांच्यात झालेल्या हाणामारीप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रविवारी दिले. एका निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे.
मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी हरि शंकर यांच्या खंडपीठाने रविवारी या घटनेबाबत् प्रसार माध्यमांमधील वृत्ताची दखल घेत स्वत: प्रकरण दाखल करून घेतले आणि हायकोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) एस. पी. गर्ग हे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करतील, असे आदेश दिले.
विशेष आयुक्त संजय सिंग आणि अतिरिक्त डीसीपी हरिंदर सिंग यांची चौकशीच्या काळात बदली केली जावी, असे निर्देश खंडपीठाने दिल्ली पोलिस आयुक्तांना दिले. तसेच कोणत्याही वकिलावर कठोर कारवाई केली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
चकमकीचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे, असे दिल्ली पोलिसांनी सुनावणीदरम्यान खंडपीठाला सांगितले. शनिवारी दुपारी येथील तीस हजारी कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये वकील आणि पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या दरम्यान किमान 20 पोलिस कर्मचारी आणि अनेक वकील जखमी झाले तर 17 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती अधिकारी आणि साक्षीदारांनी दिली.