फ्लॅटधारकाची संपूर्ण रक्कम व्याजासह मिळणार
पुणे -“लेखी करार केलेला नसल्याने घर खरेदीसाठी दिलेले पैसे परत मिळू शकणार नाही,’ अशी भूमिका घेतलेल्या बिल्डरला महारेराने दणका दिला आहे. “घर खरेदीदार आणि बिल्डर यांच्यात झालेला तोंडी करार मान्य करीत बिल्डरने फ्लॅटधारकाची संपूर्ण रक्कम व्याजासह परत करावी,’ असे आदेश महारेराने दिले आहेत.
तोंडी करारानुसार झालेला रेरामधील हा पहिलाच निकाल असावा. जयश्री शिक्ची यांनी गगन होरिझोन बिल्डरच्या गगन आकाश फेज-1 मध्ये 2012 साली फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी टोकन रक्कम म्हणून 75 हजार रुपये दिले होते. सुमारे 20 लाख रुपये किंमत असलेल्या या फ्लॅटची सर्व रक्कम तक्रारदार यांनी 2015 मध्येच बिल्डरला दिली होती.
मात्र, त्यानंतरही बिल्डरने ना साठेखत केले ना कोणतेही कागदपत्रे दिली. त्यानंतर बिल्डरने विविध कारणे सांगून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. शेवटी तक्रारदार प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना बांधकाम संथ गतीने सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, आपल्यात कोणताही लेखी करार झालेले नाहीत. त्यामुळे पैसे परत मिळू शकत नाही, असे बिल्डरने फ्लॅटधारकास सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार यांनी याबाबत महारेरामध्ये तक्रार दाखल केली होती. बिल्डरने इतरांबरोबर केलेल्या करारात पझेशनची तारीख 31 मार्च 2015 दिली होती. “पर्यावरण खात्याकडून परवानगी मिळाली नाही म्हणून प्रोजेक्ट तीन वर्ष बंद होता,’ असा बचाव बिल्डरकडून कण्यात आला. मात्र, “हे कारण विलंब होण्यासाठी योग्य नाही. तोंडी करार कायद्यानुसार मान्य आहे.
म्हणून फ्लॅटधारकाला प्रकल्पातून बाहेर पडण्याचा अधिकार रेरा कायद्याच्या कलम 18 प्रमाणे आहे,’ असा युक्तिवाद फ्लॅटधाराच्यावतीने ऍड. वीरेंद्र महाडिक व ऍड. सुरभी मेहता यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करीत बिल्डरने फ्लॅटधारकास संपूर्ण रक्कम 10.12 टक्के व्याजाने निकाल झाल्यापासून 30 दिवसांत परत करण्याचे आदेश महारेराने दिले.