पिंपरी (प्रतिनिधी) – निगडी-प्राधिकरणातील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) चिंचवड स्टेशन-आनंदनगर येथील करोना बाधितांच्या “हाय रिस्क’ संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यास स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी विरोध केला आहे. विरोध दर्शविण्यासाठी नगरसेवक व नागरिकांनी “पीसीसीओई’च्या बाहेर ठिय्या आंदोलन केले.
“पीसीसीओई’मध्ये सध्या आनंदनगर येथील 14 नागरिकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. आनंदनगरमधील आणखी काही नागरिक येथे क्वॉरंटाईन करण्यासाठी आणले जाऊ शकतात. त्याला स्थानिक नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ यांनी विरोध दर्शविला. त्यांनी याविरूद्ध पीसीसीओईच्या बाहेर आज तंबू लावून ठिय्या आंदोलन केले.
गावडे म्हणाले, प्रभाग क्रमांक 15 हा “ग्रीन झोन’मध्ये आहे. तिथे आनंदनगर या करोना हॉटस्पॉटमधील नागरिकांना क्वारंटाईन करण्यास आणल्यानंतर त्याला विरोध होणे स्वाभाविक आहे. संबंधित नागरिकांना क्वॉरंटाईन करायचे होते तर आनंदनगर जवळील शाळांमध्ये करायला हवे होते. आम्ही येथे नव्याने क्वॉरंटाईन करण्यासाठी आणखी नागरिकांना आणू देणार नाही.
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, नागरिकांना संस्थांत्मक क्वॉरंटाईन करण्यासाठी संबंधित केंद्र तयार केले आहे. सध्या तेथे आनंदनगरमधील 14 नागरिकांना क्वॉरंटाईन केले आहे. आणखी नागरिकांना क्वारंटाईन करण्याची सध्या गरज नाही. मात्र, गरजेनुसार कार्यवाही केली जाईल.