पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सध्या कॅशलेस एव्हरिव्हेर सुविधा जनरल कौन्सिल ऑफ इन्शुरन्सने (जीआयसी) विमाधारक रुग्णांसाठी लागू केली आहे. मात्र, देशातील सर्वांत माेठी डाॅक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असाेसिएशनने (आयएमए) याबाबत स्पष्टता नसल्याचे सांगत, तसेच संघटनेला काेणतीही पूर्वसूचना न देता ही सूविधा लागू केल्याचा आराेप करत निर्णयाला विराेध केला आहे.
जीआयसीने विमा पाॅलिसीधारक रुग्णांसाठी कॅशलेस एव्हरिव्हेअर नावाची सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार दि. २५ जानेवारीपासून भारतातल्या सगळ्या आरोग्य विमा कंपन्यांनी ग्राहकांना सर्वच रुग्णालयात कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रुग्णांना पॅनेलवर नसलेल्या रुग्णालयांमध्ये ही कॅशलेस सुविधा मिळू शकेल, असे त्यात नमूद केले आहे. याला आयएमएने विराेध करत संघटनेने हाॅस्पिटल बाेर्ड ऑफ इंडियाने एक पत्र काढले आहे.
जीआयसीने देशातील रुग्णालयांना विश्वासात न घेता परस्पर कॅशलेस एव्हरिव्हेअरचा निर्णय घेतला आहे.
याबाबत त्यांनी पूर्वतयारीची आणि पूर्वसूचना दिली नाही. अशा प्रकारच्या स्कीमबाबत त्यांना कळवायला हवे हाेते. तातडीच्या केसमध्ये रुग्णालयांना किती आणि कधी पैसे मिळणार, याबाबत खात्री नाही. याबाबत तक्रार करायची असल्यास तक्रार निवारण केंद्र नाही, अशी तक्रार या पत्राद्वारे केली आहे.
यामुळे आता पेशंट काेणत्याही रुग्णालयांत जाणार आणि कॅशलेस उपचारांचा आग्रह धरणार. परंतु, कॅशलेस म्हटल्यावर किती पेमेंट करणार, पेशंटची स्थिती कशी आहे ते काेण ठरवणार, चेकलिस्ट तयार नाही, रेटलिस्टबाबत काही दिले नाही. या व्यतिरिक्त खर्च लागला तर ताे काेणी द्यायचा? पाकिटाबाहेर खर्च झाला, तर ताे पेशंटकडून घ्यावा की नाही, याबाबत कोणतीही नियमावली नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे.
हा प्रकार म्हणजे इन्श्युरन्स कंपन्यांची मनमानी असून वैद्यकीय क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रकार आहे. ते छुप्या मार्गाने हाॅस्पिटलचे चार्जेस ठरवू पाहत असून त्यांचा हा अधिकार नाही. यामुळे उपचारांची गुणवत्ता घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सर्व सदस्यांना पत्र पाठवले आहे. जाेपर्यंत उपचारांबाबत स्पष्टता येत नाही, ताेपर्यंत काेणत्याही रुग्णालयांनी सामंजस्य करार अथवा कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करू नये, असे सांगण्यात आले आहे. हा निर्णय संपूर्ण देशपातळीवरचा आहे.
देशात हाॅस्पिटलची संख्या – साडेचार लाख
महाराष्ट्रातील संख्या – ५० हजार
पुण्यातील संख्या – ९००