भाजपच्या घोडदौडीने विरोधक भरकटले; आघाड्यांमध्ये ताटातूट

अंतर्गत धुसफूस, पक्षबदलाला उधाण

नवी दिल्ली: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारत केंद्राची सत्ता राखली. त्या यशात मोठा वाटा असणाऱ्या भाजपच्या घोडदौडीने विरोधक भरकटल्याचे चित्र आहे. नामुष्कीजनक पीछेहाटीमुळे विरोधकांच्या गोटात आघाड्यांमध्ये ताटातूट, अंतर्गत धुसफूस यांच्याबरोबरच पक्षबदलाला उधाण आले आहे.

एकीकडे पुन्हा देशाचा कारभार पाहण्यास सज्ज झालेल्या एनडीएच्या गोटात खुषीचे वातावरण आहे. तर विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात भाजपने केलेल्या जोरदार कामगिरीचा फटका विरोधकांना बसला. सप, बसप आणि रालोदची महाआघाडी जवळपास संपुष्टात येऊन त्या राज्यात विरोधकांचा पहिला बळी गेला. कर्नाटकमध्ये भाजपने मुसंडी मारल्याने त्या राज्यातील सत्तारूढ जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकारवरील अस्थिरतेचे सावट आणखी गडद झाले आहे. त्या राज्यातील काही सत्तारूढ आमदार केव्हाही भाजपमध्ये डेरेदाखल होतील, अशी परिस्थिती आहे.

राजस्थानात सत्तेवर असूनही लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्याने कॉंग्रेसमध्ये ब्लेमगेम सुरू झाली आहे. त्यातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट या कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांमधील बेबनावही चव्हाट्यावर आला आहे. मध्यप्रदेशातील पीछेहाटीनंतर त्या राज्यातील सरकार वाचवण्याचे मोठेच आव्हान कॉंग्रेसपुढे उभे ठाकले आहे. त्या राज्यात बसप आणि अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर कॉंग्रेस सत्तेत आहे. विरोधकांची म्हणजे तृणमूल कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या पश्‍चिम बंगालमध्येही राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच तृणमूलच्या काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूलचे आणखी काही आमदार त्यांचे अनुकरण करतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अस्वस्थताही उघड झाली आहे. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिला. लवकरच त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. कॉंग्रेसचे आणखी काही आमदार विखे-पाटील यांच्या पाऊलांवर पाऊल टाकतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होमपिच असणाऱ्या गुजरातमध्येही कॉंग्रेसमधील अस्वस्थतेने डोके वर काढल्याचे दिसत आहे. त्या राज्यातील कॉंग्रेसचे काही आमदारही भाजपमध्ये जाणे पसंत करतील, अशा राजकीय अटकळी बांधल्या जात आहेत. एकंदरीतच, लोकसभा निवडणुकीतील तडाख्याने विरोधक भांबावल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सलग दुसऱ्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त बनल्याचेच संकेत मिळत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.