पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी 148 आधार ऑपरेटरच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
1 डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सुरु करण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक सर्व बांबीची पूर्व तयारी करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आधार नोंदणीसाठी प्रोजेक्ट मॅनेजर 1, आधार ऑपरेटर 144, राज्यस्तरावर ऑपरेटर 4 अशा मुनष्यबळांची सेवा पुरवठ्याकरीता ई-निविदा प्रक्रियाद्वारे क्रीश इंट्राट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड केली असून करारनामाही झाला आहे.
येत्या 31 मार्चपर्यंत आधार नोंदणीचे काम पूर्ण करावे लागणार आहे. निविदा मसुदा व करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार मनुष्यबळ सेवा पुरवठा करण्याबाबतचे आदेशही संबंधित कंपनीला दिले आहेत. आधार नोंदणी केंद्र तालुकानिहाय सुरु होणार आहे.
मनुष्यबळाच्या सेवा क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. ऑपरेटरच्या नियुक्त्यांची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करणेही आवश्यक आहे.