महिलांना, नागरिकांना त्रास तर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
देहूरोड – मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड येथील उड्डाणपुला खालील पुलाच्या खांबाच्याव कट्टयावरच मद्यपी खुलेआम मद्यपान करीत आहे. मद्यपानानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ व आरडाओरड करीत बाटल्या फोडत आहे .तर अनेक जण तेथेच लघुशंका करीत असल्याने नागरिकांना विशेषत: महिला वर्गाला मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देहूरोड येथे पुणे-मुंबई महामार्गावर सुमारे एक किमी अंतराचा उड्डाणपूल उभारला आहे. या उड्डाणपुलाच्या खांबांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खांबालगत कट्टा बांधण्यात आला आहे. पुलाच्या दुतर्फा सेवा रस्ता असून त्याठिकाणी असलेल्या देशी-विदेशी मद्य विक्रीच्या दुकानातून मद्य विकत घेऊन हे मद्यपी खुलेआमपणे या कट्ट्यांवर मद्यप्राशन करीत बसतात.
ते एवढ्यावरच थांबत नाहीत, तर मद्यपानानंतर प्लॅस्टिकचे ग्लास व बाटल्या तेथेच फेकून देतात. तर अनेक मद्यपी पुलाखाली किंवा रस्त्यांवर रिकाम्या बाटल्या फोडतात. मद्यप्राशनानंतर झिंगलेले मद्यपी अश्लील भाषेत आरडाओरड करत गोंधळ घालत असतात तर काही मद्यपी कट्ट्या लगतच लघुशंकाही करत असतात. त्यामुळे पुलाखालील भाग अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त बनत आहे.
पुलालगतच्या सेवा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यानागरिकां बरोबर महिलावर्गाला अशा मद्यपीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाण पुलाखाली हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे ; मात्र मद्यपींच्या गोंधळाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे .देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला असतानाही कारवाई होत नसल्याची खंत महिलावर्ग करीत आहे.