आकुर्डी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. त्यात आठ मुख्य रुग्णालय आहेत. तर 29 दवाखाने आहेत. परंतु शहरातील केवळ दोनच रुग्णालयांतच नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभाग आहेत. त्यामुळे उर्वरित सहा रुग्णालयांत नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभाग सुरू करावेत, अशी मागणी “आप’च्या वतीने करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे पिंपरीचिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांच्या वर पोहोचली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. मनपाच्या रुग्णालयांत प्रसूती विनामूल्य असल्याने अनेक गरीब व गरजू नागरिक या रुग्णालयांची वाट धरतात. शहरातील महापालिकेच्या आठ रुग्णालयांत प्रसूतिगृह आहेत. परंतु यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (वायसीएम) आणि आकुर्डी रुग्णालयामध्येच नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाची सुविधा आहे. उर्वरित 6 रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग नाही. त्यामुळे इतर रुग्णालयांमध्ये लवकरात लवकर अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी आपच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी प्रशासकीय कार्यप्रमुख यल्लपा वालदोर, सरोज कदम उपस्थित होते.
नातेवाइकांची होतेय धावपळ
महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग नाही. त्या ठिकाणी प्रसूती झालेल्या बाळांसाठी जर “एनआयसीयू’ची गरज भासली तर त्यांना आकुर्डी अथवा वायसीएम रुग्णालयात हलवावे लागत आहे. त्यात गरोदर माता आणि नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. त्यात देखील या दोन्ही रुग्णालयांत बेड उपलब्ध नसेल तर खासगी रुग्णालयांत भरती करावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असून आर्थिक फटका बसत आहे. मनपा रुग्णालयात अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवाव्यात.