प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या 150 ई-बसपैकी 90 बसचा लोकार्पण सोहळा व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे स्टेशन ई-बस डेपोचा उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडेय यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.2) पुणे स्टेशन येथे होणार आहे.
ई-बस येऊन दीड ते दोन महिने होऊन गेले तरी या बस मार्गावर धावत नसल्याने नागरिकांकडून टीका करण्यात येत होती. यापूर्वी या बसचे उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी करण्याचे ठरले होते; पण केंद्रीय मंत्र्यांना वेळ न मिळाल्यामुळे ऐन उद्घाटनाच्या आदल्या दिवशी हा सोहळा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती.
केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या 150 ई-बससाठी प्रति बस 55 लाख रुपयेप्रमाणे सबसिडी केंद्र सरकारने दिली आहे. पुणे स्टेशन ई-बस डेपोतून 15 विविध मार्गांचे 90 शेड्यूलद्वारे नियोजन करण्यात आले आहे.
सदरच्या ई-बस हिंजवडी माण फेज, गोखलेनगर, आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, मांजरी बु., रांजणगाव/कारेगाव, खराडी, विमाननगर, कोंढवा खुर्द, साळुंके विहार, चिंचवड गाव,
शेवाळेवाडी या मार्गांवर धावणार आहेत. पुणे स्टेशन डेपोमध्ये बस चार्जिंगसाठी 45 अउ/ऊउ चार्जर बसविलेले आहेत. तसेच प्रति दिन प्रति बस 225 किमी. धावणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
ई-बसची वैशिष्ट्ये
12 मीटर लांबी
33 आसन क्षमता
संपूर्ण वातानुकूलित
दिव्यांगांसाठी खास सुविधा
आयटीएमए यंत्रणा
मोबाइल चार्जिंग सुविधा