वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हायड्रोक्झीक्लोरोक्वीनच्या गोळ्या नियमितपणे घेत असल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनीच आज या विषयी भाष्य करताना सांगितले की, केवळ करोना दक्षतेचा भाग म्हणून मी या गोळ्या नियमितपणे घेत आहे. या गोळ्या सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष मध्यंतरी काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी काढला होता.
तथापि दक्षता म्हणून आपण ही उपाययोजना सुरू केली असल्याची माहिती ट्रम्प यांनी आज पत्रकारांशी नियमित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना दिली. केवळ मी या गोळ्यांचे प्रमोशन करतो म्हणून काही लोक या गोळ्यांची बदनामी करू लागले आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, माझ्याऐवजी दुसऱ्या कोणी या गोळ्यांचे प्रमोशन केले असते तर लगेच या गोळ्या भारी ठरवल्या गेल्या असत्या. मी एक वाईट प्रमोटर आहे असे विधानही त्यांनी बोलण्याच्या ओघात केले. पण मला व्यक्तिशः वाटते की हे एक प्रभावी औषध आहे आणि त्यातून तुमचे काहीही नुकसान होत नाही.
तुमचा बचाव करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे अशी भलामणही त्यांनी या गोळ्यांची केली. या गोळ्यांवर इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्ये मोठे संशोधन सुरू असून अमेरिकेतील संशोधकही याबाबतीत अधिक विधायक मत बाळगून आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. बचावासाठीचे हे खूपच कमी खर्चाचे औषध आहे, असेही ट्रम्प यांनी नमूद केले. या गोळ्यांविषयी झालेले आधीचे संशोधन चुकीचेच होते असे आपले मत असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.