पुणे -ग्रामीण, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डातील लसीकरणासाठी केवळ 4 हजार नवीन कोविशील्ड लसीचे डोस मिळाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेकडून हे डोस सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाभार्थी लसीकरणाची संख्या लक्षात घेता, हा साठा खूपच कमी आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाला याबाबत निवेदन देऊन, लसीचा साठा समप्रमाणात व्हावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी सांगितले. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून लसीचे डोसची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते.
गुरूवारी (दि. 14) कोविशील्ड लसीचे 4 हजार डोस आले आहेत. त्यामुळे किमान बंद झालेल्या केंद्रावर लसीकरण सुरू राहील ही अपेक्षा आहे. मात्र, त्यामध्ये अनेकांना लस उपलब्ध न झाल्यामुळे परत माघारी जावे लागत आहे. दरम्यान पुढीलप्रमाणे तालुकानिहाय लसीचा साठा वितरीत करण्यात आला.
आंबेगाव – 250, बारामती – 250, भोर – 150, दौंड – 250, हवेली – 300, इंदापूर – 250 जुन्नर – 250, खेड – 300, मावळ – 250, मुळशी – 250, पुरंदर – 200, शिरूर – 250, औंध जिल्हा रूग्णालय – 400, पुणे कॅन्टोन्मेंट – 100, खडकी कॅन्टोन्मेंट – 100.