पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांमधील रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पाच दिवसांत 2 हजार 830 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. सोयीच्या व नामांकित शाळा प्रवेशासाठी मिळत नसल्यामुळे प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठीही पालकांकडून फारसा उत्साह दाखवला जात नाही.
वंचित व दुर्बल घटकातील बालकांना “आरटीई’अंतर्गत विना अनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यासाठी 3 लाख 64 हजार 414 बालकांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल केले होते. ऑनलाईन लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांची प्रवेशासाठीची निवड यादीही जाहीर करण्यात आली होती. तर प्रतीक्षा यादीत 81 हजार 129 बालकांचा समावेश करण्यात आला होता.
निवड यादीतील केवळ 64 हजार 250 बालकांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश नोंदविले आहेत. या प्रवेशानंतरही राज्यात 37 हजार 596 प्रवेशाच्या जागा रिक्तच राहिल्या आहेत. रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील बालकांसाठी 30 मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. 12 मेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकांच्या पालकांसाठी “आरटीई’ पोर्टलवर सूचनाही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात 25 हजार 890 बालकांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. यातील काही बालकांचे प्रवेशही झाले आहेत. उर्वरित काही बालकांचे प्रवेश झाले तरी दरवर्षीप्रमाणे जागा रिक्त राहण्याची परंपरा यंदाही कायमच राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातील 935 शाळांमध्ये 15 हजार 596 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यासाठी 77 हजार 531 बालकांचे अर्ज दाखल झाले होते. लॉटरीद्वारे निवड यादीत 15 हजार 501 बालकांचा समावेश झाला होता. यातील 10 हजार 752 बालकांचे प्रवेश निश्चित झाले.