पिंपरी – शहरातील मटका आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई करत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु ऑनलाइन जुगार मात्र दणक्यात सुरू आहेत. या ऑनलाइन जुगारामुळे अनेक कुटुंब उध्दवस्त झाली आहेत. परंतु हा जुगार अधिकृत असल्याप्रमाणे त्याच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सोशल मीडियावर एखादी क्लिप पहायला गेलो तर सर्वप्रथम उत्पादनांची जाहिरात पहावी लागत होती. आता या उत्पादनांऐवजी ऑनलाइन जुगाराची जाहिरात पहावी लागत आहे. एवढेच नव्हे तर टिव्हीवर देखील ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
जाहिरातीच्या शेवटी “यात आर्थिक जोखम असल्याचे सांगत या खेळाचे व्यसन लागू शकते’, असेही सांगितले जाते. सार्वजनिक ठिकाणी खेळणाऱ्या जुगारावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887 नुसार गुन्हा दाखल होतो.
या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. मात्र या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळत नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांना या कायद्याचा धाक राहिलेला नाही. मात्र हाच खेळ स्वतःच्या घरात खेळणे गुन्हा नसल्याचे कायद्याचे म्हणणे आहे.
इंटरनेटमुळे ऑनलाइन रम्मीची पाळेमुळे खेडोपाडी पोहचली आहे. एवढेच नव्हे तर मटका, ऑनलाइन लॉटरी, तीन पत्ती, चक्री यातून तरुण पिढी बरबाद होत आहे. या खेळात हरल्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे केरळ सरकारने ऑनलाइन रम्मी या खेळावर बंदी घातली. या बंदीच्या विरोधात संबंधित कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने रम्मी हा गेम ऑफ स्कील (बुद्धीचा खेळ) आणि ऑनलाइन लॉटरी हा “लक’चा खेळाचा प्रकार आहे. यातून मिळणारा नफा हा एखाद्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यासारखा असल्याचे सांगत ही बंदी उठविली.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध धंद्यावर कारवाईचा धडका लावल्यानंतर शहरातील अवैध धंदे जवळपास बंद झाले असल्याचे वरकरणी वाटत असले तरी याला पर्याय अवैध धंदेवाल्यांनी शोधला आहे.
मटक्याचे बुकींग आणि पैसे ऑनलाइन पद्धतीने घेतले जात असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या धाडींनतर स्पष्ट झाले आहे. तसेच ऑनलाइन रम्मीमधून पैसे गमाविल्याबाबत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली आहे.
असे टाकले जाते जाळे
ऑनलाइन जुगारासाठी संकेतस्थळ किंवा ऍप तयार केले जाते. सुरुवातीला खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता तुमच्या खात्यात काही रक्कम बोनस म्हणून टाकली जाते. सुरुवातीला तुम्ही जिंकावे, असे पत्ते खेळण्यासाठी दिले जातात. त्यानंतर तुम्ही त्या खेळात गुंतत जाता आणि तुम्हाला त्याचे व्यसन लागते. या खेळात पेमेंटही ऑनलाइन घेतले जाते.