पुणे – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून, पुणे जिल्ह्यात आणि पुणे विभागात येणाऱ्या अन्य जिल्ह्यांत मिळून 61 लाख 7 हजार 525 रुपये किंमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 33 लाख 51 हजार 796 रुपये किंमतीचा, तर विभागातील इतर जिल्ह्यांत 27 लाख 55 हजार 729 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
दि.25 ते 31 ऑक्टोबरदरम्यान हे छापे टाकण्यात आले. पुणे जिल्ह्यात खवा, खाद्यतेल, पनीर आणि इतर अन्नपदार्थ असे एकूण 46 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. पुणे कार्यालयाने खाद्यतेल, खवा, स्वीट खवा, पनीर, गूळ तसेच अन्य अन्नपदार्थ यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये म्हणजे कोल्हापुरात खवा, खाद्यतेल, दलिया, मिक्स फ्लोअर, सुजी रवा, पोहे, चणा डाळ, मिरची पावडर आणि अपमिश्रके म्हणजे व्हाइट पावडर, स्क्रीम्ड मिल्क पावडर आदी अन्नपदार्थ जप्त केले. सांगली येथे खाद्यतेल आणि खवा, सोलापूर जिल्ह्यात चहा पावडर आणि अन्य अन्न पदार्थ जप्त करण्यात आले.
येथे साधा संपर्क
अन्नभेसळीचे प्रकार आढळले तर 1800-222-365 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.