मुंबई – मुंबईत मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जेजे रुग्णालयात उपचारांदरम्यान या महिलेने आपले शेवटचा श्वास घेतला आहे. वारंवार खेटे घातल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने त्यांनी काल दुपारी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एका वृत्तवाहिनेने याबाबत वृत्त दिले आहे.
शीतल गादेकर (रा. धुळे) यांचा जेजे रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईच्या संगीता डवरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भूखंडासाठीचा लढा अयशस्वी ठरल्याने या दोघींनी मंत्रालयाबाहेर काल विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
सोमवारी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान मंत्रालयाच्या मुख्य दरवाजावर दोघींनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोघीही वेगवेगळ्या ठिकाणांहून आल्या होत्या. यांपैकी शीत गादेकर या धुळ्याहून तर संगीता डवरे या नवी मुंबईतून आल्या होत्या.
एमआयडीसीमधील जागेबाबत फसवणूक झाल्याचा आरोप शितल यांनी केला होता. यासाठी न्याय मिळावा म्हणून त्यांनी वारंवार मंत्रालयात खेटेही घातले होते. पण अद्यापही आपल्याला न्याय मिळाला नसल्याचे सांगत त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले होते.
तर पतीच्या आजारपणात रुग्णालयाचा जो खर्च आला होता, त्यामध्ये मोठी तफावत असून यातून आमची फसवणूक झाल्याचा आरोप संगिता डवरे यांनी केला होता. सध्या संगिता यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.