जयपूर – राजस्थान रॉयल्सने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांत सरस कामगिरी करत आयपीएल स्पर्धेत गुरुवारी एकतर्फी ठरलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर 32 धावांनी सहज मात केली.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आक्रमक फटकेबाजी करत डेव्हन कॉनवेसह 42 धावांची सलामी दिली.
कॉनवे अवघ्या 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर भरात असलेल्या अजिंक्य रहाणेने ऋतुराजला साथ देत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. ऋतुराजने वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 47 धावांवर विकेट बहाल केली. या खेळीत त्याने 29 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावला. रहाणेने 13 चेंडूत 15 धावा केल्या.
एका बाजूला शिवम दुबे स्थिरावला होता तर दुसरीकडे अम्बाती रायडूने मात्र साफ निराशा केली. दुबेला मोईन अलीने साथ देत संघाचे शतक पूर्ण केले. एकवेळ 4 बाद 73 अशा संकटात सापडलेल्या चेन्नईला या जोडीने सावरण्याचा प्रयत्न केला. दुबे व मोईनने अर्धशतकी भागीदारी केली; परंतु पुन्हा एकदा मोईनला अनावश्यक फटकेबाजी भोवली व तो 12 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला. त्यालाही झम्पाच्याच फिरकीने चकवले. आता त्यांना 5 षटकांत 77 धावांची गरज होती.
दुबेने वादळी फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. जडेजाही वेगाने धावा करत होता. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. डावातील अखेरच्या षटकांतील अखेरच्या चेंडूवर दुबे बाद झाला. त्याने 52 धावांच्या खेळीत 33 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकार फटकावले. जडेजाने नाबाद 23 धावांची खेळी करताना 15 चेंडूत 3 चौकार फटकावले. राजस्थानकडून ऍडम झम्पाने 3 तर रवीचंद्रन अश्विनने 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी, यशस्वी जयस्वालसह ध्रुव जुरल व देवदत्त पडीक्कल यांनी केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 203 धावा करण्याचे आव्हान ठेवले. जयस्वाल बाद झाल्यावर एकवेळ संथ झालेल्या त्यांच्या डावाला जुरल व पडीक्कल यांनी पुन्हा वेग दिला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल व जोस बटलर यांनी 9 व्या षटकातच संघाला 85 धावांची सलामी दिली. बटलर सुरेख खेळत असताना 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावा करून परतला.
त्यानंतर कर्णधार सॅमसनने जयस्वालसह संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, तो देखील स्थिरावल्यावर 17 चेंडूत 1 चौकार फटकावत 17 धावांवर बाद झाला. दरम्यान, जयस्वालने आपले अर्धशतक थाटात साकार केले. मात्र, समोरून अन्य फलंदाज बेजबाबदार पद्धतीने फटके मारून बाद होत गेले. जयस्वालचाही संयम सुटला व त्यानेही आत्मघातकी फटका खेळत आपली विकेट गमावली. त्याने आपल्या 77 धावांच्या खेळीत 43 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. शेमरन हेटमायर साफ अपयशी ठरला.
त्यानंतर ध्रुव जुरेल व देवदत्त पडीक्कलने संघाचे दीडशतक फलकावर लावले. मात्र, जयस्वाल खेळत असतानाची त्यांची सरासरी तो बाद झाल्यावर घसरली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 48 धावांची भागीदारी केली. जुरेल धावबाद झाला. त्याने 15 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. पडीक्कलने रवीचंद्रन अश्विनच्या साथीत संघाचे द्विशतक फलकावर लावले. पडीक्कल 13 चेंडूत 5 चौकारांसह 23 धावांवर नाबाद राहिला. अश्विनने नाबाद 1 धाव केली. चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 5 बाद 202 धावा. (यशस्वी जयस्वाल 77, ध्रुव जुरल 34, जोस बटलर 27, देवदत्त पडीक्कल नाबाद 23, संजू सॅमसन 17, तुषार देशपांडे 2-42, महिश तक्षिणा 1-24, रवींद्र जडेजा 1-32). चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 170 धावा. (शिवम दुबे 52, ऋतुराज गायकवाड 47, मोईन अली 23, अजिंक्य रहाणे 15, रवींद्र जडेजा नाबाद 23, ऍडम झम्पा 3-22, रवीचंद्रन अश्विन 2-35, कुलदीप यादव 1-18).