कराड,(प्रतिनिधी) – पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर, ता. कराडच्या हद्दीत मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास आयशर टेम्पोला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील एक जण किरकोळ जखमी झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही.
यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे हवालदार धीरज चतुर, सुनील कदम, डीपी जैन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी दस्तगीर आगा, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी आणि नागरिकांनी घटनास्थळी मदत केली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून, वाहतूक पूर्ववत करण्यात आली.