श्रीगोंदा -नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव शिवारात रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीाषण अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. भास्कर तोरडे (रा.रायरा ता. घनसांगवी जि. जालना) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दौंडहून नगरच्या दिशेने (एम.एच.12 एजे 9327) ही कार निघाली होती. पहाटे चारच्या दरम्यान कार घारगाव शिवारातील कन्हेरमळा येथे आली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कारचे तोंड दौंडच्या दिशेने गेले. या अपघातात चालकाशेजारी बसलेले भास्कर तोरडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
कारमधील इतर पाचजण जखमी झाले आहेत, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. या अपघातात मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वाहनातून बाहेर काढत नगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींमध्ये पोलीस पती-पत्नीचा समावेश असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.