जुन्नर, (वार्ताहर) – तांत्रिक क्षमता व माहितीचा अभाव तसेच रोजगार हमी योजनेबाबत सर्व पातळ्यांवर असणारी अनास्था यामुळे गावात करता येऊ शकणार्या रोजगार हमीच्या एकूण 266 कामांपैकी फार थोडी कामे हाती घेतली जातात. त्यामध्ये बर्याचदा नियोजनाचा अभाव असतो. जॉब कार्ड मिळवण्यात, कामाची मागणी करण्यात तसेच आराखडे बनविताना येणार्या अनेक अडचणींबाबत ग्रामसेवक व सरपंचानी पाढाच वाचला.
जुन्नर तालुक्यातील धरण क्षेत्रातील व टंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निसर्गपूरक उपाययोजना व रोजगार हमी योजनेचा प्रभावी वापर या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन द नेचर कॉन्झर्वन्सी संस्थेच्या वतीने पंचायत समिती जुन्नर येथे करण्यात आले होते. तालुक्यातील 47 गावांच्या ग्रामसेवक व सरपंचानी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
या प्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी हेमंत गरीबे, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी बुधवंत, मीना नदीवर काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्या वीणा पाटील, सनियंत्रण अधिकारी ज्ञानेश नानोरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार, शांताबाई वर्वे तसेच शाश्वत संस्थेचे कार्यकर्त्यांसह द नेचर कॉन्झर्वन्सी संस्थेचा संपूर्ण चमू उपस्थित होता.