कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील दुधोडी, भांबोरा भागात इलेक्ट्रिक मोटर तसेच वायरची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी सापळा लावून आणखी एका आरोपीला आज दुपारी अटक केली. अक्षय हनुमंत काटकर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस नाईक भाऊसाहेब यमगर, पांडुरंग वीर, सागर मेहेत्रे, भाऊसाहेब काळे, निलेश फुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी दुधोडी येथून बारामतीला जाणार असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.
दरम्यान, तो खेड चेकपोस्ट येथून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चेकपोस्टवर संपर्क केला. तेथील पोलिसांनी काटकर यास ताब्यात घेतले. वायर चोरी प्रकरणी पोलिसांनी सुरेश मोहन परकाळे याला अटक केली होती.