नवीन पथदर्शी मॉडेल तयार करणार : आव्हाड
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून, नवीन पथदर्शी मॉडेल तयार करण्यात येणार आहे. लवकर या कामाला गती देणार असून, झोपडपट्टीवासियांना येत्या काही महिन्यांत ओळखपत्र देण्याचा विचार असल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
आव्हाड यांनी शनिवारी (दि. 20) झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्प तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. यावेळी अपर मुख्य सचिव संजीव कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, श्रावण हर्डीकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, सतीश मगर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, रतन किराड, मनोज सारडा, जयंत शेटे आदी उपस्थित होते.
यावेळी झोपडपट्टी विकासाच्या धोरणाची वाटचाल, योजना अंमलबजावणीची प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्य:स्थिती, तेथील अडचणी, शासनाचे अर्थसहाय, झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, अंतर्भूत प्रकल्प, सध्याची स्थिती, अडकलेले प्रकल्प, प्रस्ताव आदी विषयांसह शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठेच्या अडचणी, त्या सोडवणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.
अशी असेल समिती
शहरात ज्या सनदी अधिकाऱ्यांनी यापूर्वी काम केले आहे. शहरांच्या विकासासाठी योगदान दिले आहे, अशा माजी सनदी अधिकाऱ्यांचा सहभाग या समितीमध्ये असेल. सोबतच शहर विकासात योगदान देणारे इतर जाणकार प्रतिनिधीही असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या समिती तसेच झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कार्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले.