ओंकार दळवी
जामखेड – कर्जत व जामखेड मतदारसंघात मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत कर्जत-जामखेड तालुक्यातील 1 लाख 51 हजार 841 मतदान कार्ड आधार लिंक करण्यात आले आहेत. कमी वेळेत जास्तीत-जास्त मतदारांचे आधार कार्ड लिंकिंग करण्यात आले आहे.
दुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असण्यासारखे दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक केले जात आहे. दि.31 मार्च 2023 पर्यंत 100 टक्के मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्याचे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने ठेवले आहे. संबंधित मतदाराला त्याकरीता अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे.
मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे, एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदार संघात अथवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी तपासण्यासाठी आधार क्रमांकाचे संकलन उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत समाविष्ट माहितीची पडताळणी करणे सोपे होणार आहे.
कर्जत व जामखेड तालुक्यात एकूण मतदार 3 लाख 29 हजार 702 मतदार आहेत. दि. 1 ऑगस्टपासून मतदान व आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत 87 हजार मतदान कार्ड आधार लिंक करण्यात आले आहेत. यासाठी 353 बीएलओ काम करत आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने घर बसल्या मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आधार लिंक सोपे झाले आहे.
मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून बीएलओ यांना आधार कार्डची गोपनियता पाळून मतदान कार्डाला आधार कार्ड लिंक करण्याची सूचना देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 51 हजार 841 मतदान कार्ड आधार लिंक करण्यात आले आहेत. त्यामुळे जनतेने याचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे.
– योगेश चंद्रे, तहसीलदार, जामखेड