पुणे – पश्चिम बंगाल येथील एका कारागिराने पुण्यातील सराफाला तब्बल दिड कोटीचा गंडा घातला. दागिने बनविण्यासाठी चोख सोने घेऊन त्याने पळ काढला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीर शेख(41,रा.कसबा पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार मेहबुब शेख(रा.रविवार पेठ, मुळ पश्चिम बंगाल) याच्यावर फसवणूक व इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा अल्पना थिएटर जवळ गणेश पेठेत झेड ज्वेलर्स अँड एंन्टरप्रायजेस नावाने दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांची एका ओळखीच्या व्यक्ती मार्फत आरोपीबरोबर ओळख झाली होती.
आरोपीने सुरवातीला त्यांना चोख सोन्याच्या बदल्यात चांगले दागिने बनवून दिले होते. त्याने विश्वास संपादन केल्यावर फिर्यादी जमीर यांनी त्याला 1 कोटी 43 लाख 12 हजाराचे चोख सोने दागिणे घडविण्यासाठी दिले होते. यासंदर्भात त्याने फिर्यादी जमिर यांना एक डायरिमध्ये व्यवहाराची नोंद करुन दिली होती.
दरम्यान त्यांना चोख सोन्यापासून दागिने बनविले असल्याचे दाखवण्यासाठी बनावट दागिने दाखवले. यानंतर चोख सोन्यापासून बनवलेले दागिने न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.