पिंपरी – महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. ३) सावित्रीबाई फुले स्मारक येथे महिला शिक्षण दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात आले आहे. विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते बुधवारी सकाळी अकरा वाजता सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार आहे. तत्पुर्वी, महापालिकेत सकाळी साडेदहा वाजता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर पावने दहा वाजता तळमजल्यावर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर मोशी येथील महापालिकेच्या शाळेमधील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.
विचार प्रबोधन पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी उत्कृष्ट महिला बचत गटांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता मी तुमची सावित्रीबाई फुले हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर होईल. दुपारी साडेबारा वाजता सावित्रीच्या ज्योती हा संगीत, नाट्य, नृत्य आणि गीतांचा कार्यक्रम सादर होईल. दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यामध्ये निमंत्रित कवी आपल्या कविता सादर करतील. सायंकाळी पाच वाजता सावित्रीच्या लेकी या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी सात वाजता जागर समतेचा या सांस्कृतिक प्रबोधनात्मक शाहिरी जलसेच्या कार्यक्रमाद्वारे विचार प्रबोधन पर्वाची सांगता होईल.