मुंबई – आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पदरित्या कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. समन्स बजावल्यानंतर आज सकाळी जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
ईडी राजकीय सुडापोटी विरोधी पक्षांच्या नेत्याना अशा नोटिसा जारी करून धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केला आहे. दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की.., “ईडी आणि भारत सरकारच्या पोलीस यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जात आहे हे सर्वांना माहिती आहे. सर्वात आधी माझ्यावर प्रयोग करण्यात आला. त्यावेळी ईडी काय सर्वांना माहिती नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, की भीती निर्माण करु नका. लोकशाही मार्गाने निषेध केला जात आहे.
जयंत पाटील यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. भाजपाकडे लॉंड्री आहे, त्यांच्याकडे जे येतात ते स्वच्छ करतात. यंत्रणांवर दबाव टाकण्याचा हेत नाही. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसयाचे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.
जयंत पाटील काय म्हणतात पाहा…
“मी विरोधी पक्षाचा भाग आहे आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. आयएल ऍन्ड एफएस कंपनीच्या प्रकरणात जयंत पाटील यांना चौकशीसाठी ईडीने बोलावले होते. तथापि, मी यापूर्वी कधीही या संस्थेचे नावही ऐकले नव्हते;
परंतु ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला त्यांच्यासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. कायदेशीर चौकटीत राहून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.