बंगळूर – देशातील पहिले दोन ओमायक्रॉन बाधित काही दिवसांपूर्वी कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये आढळले. त्या दोन बाधितांपैकी एक असणारा डॉक्टर बरा झाल्यानंतर पुन्हा करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
जगात सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनची नोंद झाली. करोनाच्या त्या नव्या प्रकाराचे दोन बाधित बंगळूरमध्ये आढळले. त्यामध्ये डॉक्टर आणि दक्षिण आफ्रिकन नागरिक असणाऱ्या गुजराती व्यक्तीचा समावेश आहे. कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास न करणारा डॉक्टर ओमायक्रॉनबाधित आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. आता पुन्हा करोनाबाधित होण्याची आणखी आश्चर्यकारक घडामोड त्या डॉक्टरबाबत घडली आहे. त्या डॉक्टरमध्ये कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, ओमायक्रॉनबाधित दक्षिण आफ्रिकन नागरिक अधिकाऱ्यांना पूर्वसूचना न देताच दुबईला रवाना झाला. क्वारंटाईन नियमांचा भंग केल्याबद्दल बंगळूर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याला जाऊ दिल्याबद्दल हॉटेलच्या व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल करण्यात आला.