श्रीनगर -छत्तिसगढचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भुपेश बघेल यांच्या एका वक्तव्यामुळे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला संतापले आहेत. त्यातून बघेल यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा ओमर यांनी दिला आहे.
बघेल यांनी एका मुलाखतीत ओमर यांची स्थानबद्धतेतून सुटका होण्याचा संबंध राजस्थानमधील नेते सचिन पायलट यांच्याशी बंडखोरीशी लावला. त्या मुलाखतीत बघेल म्हणाले, ओमर आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना एकाच वेळी स्थानबद्ध करण्यात आले. मेहबुबा अजूनही स्थानबद्ध आहेत. मात्र, ओमर यांची सुटका झाली आहे. पायलट यांचे मेहुणे असल्याने ओमर यांची सुटका झाली का? ओमर यांच्या सुटकेबाबत तशी शक्यता एखाद्याला वाटू शकते, अशी पुस्ती बघेल यांनी जोडली.
पायलट यांनी ओमर यांच्या भगिनी सारा अब्दुल्ला यांच्याशी विवाह केला असल्याचा संदर्भ घेऊन बघेल यांनी संबंधित वक्तव्य केले. त्यावर ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना ओमर यांनी पायलट यांच्या कृतींशी माझ्या आणि वडिलांच्या (फारूक अब्दुल्ला) सुटकेशी संबंध जोडणारा आरोप खोटा असल्याचे म्हटले. बघेल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्या निर्णयामुळे स्थिती बिघडू नये यासाठी जम्मू-काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यामध्ये अब्दुल्ला पिता-पुत्र आणि मेहबुबा या माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. काही महिन्यापूंर्वी अब्दुल्ला पिता-पुत्रांची स्थानबद्धतेतून सुटका झाली. आता ओमर यांच्या सुटकेवरून बघेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत.