यूजीन :- भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने यूजीन, अमेरिकेत इतिहास रचला. त्याने रविवारी (24 जुलै) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेच या स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या स्पर्धेत तब्बल 19 वर्षांनंतर भारताला पदक मिळाले आहे. याआधी अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडी मध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते.
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरला. त्याचा पहिला फेक फाऊल घोषित करण्यात आला. त्यानंतर चोप्राने दुसऱ्या फेरीत 82.39 मीटर अंतरावर भालाफेक केली. नीरजचा प्रतिस्पर्धी ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर आणि दुसऱ्या फेरीत 90.46 मीटर भालाफेक करून नीरजवर दबाव आणला. यानंतर नीरजने तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत कामगिरीत सातत्य राखले. तिसऱ्या फेरीत 86.37 मीटर आणि चौथ्या फेरीत 88.13 मीटर भालाफेक करण्यात त्याला यश आले.
नीरज पाचव्या फेरीत अपयशी ठरला. पीटर्सने 90.54 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचने 88.09 गुणांसह कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेतील दुसरा भारतीय खेळाडू रोहित यादव अंतिम फेरीत दहाव्या स्थानावर राहिला. तिसऱ्या फेरीनंतर तो बाद झाला. त्याने पहिल्या फेरीत 77.96 मीटर, दुसऱ्या फेरीत 78.05 आणि तिसऱ्या फेरीत 78.72 मीटर भालाफेक केली.
ऑलिम्पिकपासून जबरदस्त भरात
नीरजने नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत मानाच्या डायमंड लीग मैदानी स्पर्धेत रजतपदक जिंकत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्या स्पर्धेत नीरजने 89.94 मीटर अंतर नोंदवले होते. तसेच 2018 साली झ्युरिचला झालेल्या डायमंड लीगमध्येच पुढील फेरीत नीरजने चौथे स्थान मिळवले होते. त्या स्पर्धेत त्याने 85.73 मीटर अंतरावर भालाफेक केली होती. फिनलंड येथे झालेल्या पोव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेतही चमकदार कामगिरी करताना नीरजने राष्ट्रीय विक्रम साकार केला होता. त्यावेळी त्याने 89.30 मीटर भालाफेक करत रजतपदकावर नाव कोरले होते. त्यानंतर झालेल्या क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत अत्यंत प्रतिकूल वातावरणातही नीरजने 86.30 मीटर अंतर पार केले होते.