पुणे- पुणे रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वारापासून ते ताडिवाला रस्त्याला जोडणारा आणि स्थानकाच्या 6 प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी सोयीचा असणारा पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज) धोकादायक असल्याने बंद ठेवण्यात आला आहे. “ब्रिटीशकालीन पर्वा’चा साक्षीदार असणारा हा पादचारी पूल येत्या काळात जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.
करोनामुळे पूल बंदच
करोनाच्या पार्श्वभूमीवर देखील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पादचारी पूल निश्चित केले होते. त्यामुळे मार्च 2020 मध्ये बंद केलेला हा पूल अद्यापही बंद ठेवला आहे. परंतु, जुन्या पुलावर वृद्ध, दिव्यांग नागरिकांसाठी सोयीच्या असणाऱ्या “रॅम्प’ची देखील सुविधा असून, सध्याच्या पादचारी पुलांना केवळ जिन्यांच्या पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे जुना पादचारी पूल सोयीचा असल्याचे प्रवासी सांगतात.
प्लॅटफॉर्मवर बसवणार लिफ्ट
पुणे स्थानकात 6 प्लॅटफॉर्म आहेत. तेथून पादचारी पुलाला जोडणारी लिफ्ट बसवण्यात येणार आहे. याबाबत सर्व्हेक्षणदेखील झाले असून, पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुख्यालयाला पाठवण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. प्रामुख्याने सध्या ज्येष्ठ नागरिक आणि व्हीलचेअरवरील नागरिकांना प्लॅटफॉर्म पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.
80 वर्षांचा प्रवास
ब्रिटीश राजवटीच्या काळात सुमारे 1925 मध्ये सध्याच्या पुणे स्टेशनची निर्मिती झाली. त्यानंतर काही वर्षांमध्येच प्लॅटफॉर्मला जोडणारे पादचारी पूल बांधण्यात आले. आरक्षण कक्षापासून ते ताडिवाला रस्त्यापर्यंतच्या सहाही प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या या पुलामुळे सुमारे 80 हून अधिक वर्षे या पुलावरून नागरिकांची सोय होत होती.
जुना पादचारी पूल प्रवाशांना ये-जा करण्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल बंद ठेवला आहे. तर प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसविणे प्रस्तावित आहे. मुख्यालयाच्या परवानगीनंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे विभाग
ऑडिटनंतर निर्णय
पुणे रेल्वे स्थानकातील सर्वांत जुना पादचारी पूल अशीदेखील पुलाची ओळख आहे. पण, प्रशासनाने केलेल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या ऑडिटमध्ये संबंधित पूल धोकादायक असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असे सांगण्यात येत आहे.
अशीही एक आठवण
डिस्प्ले बोर्डवर रेल्वेचे वेळापत्रक पाहण्यापेक्षा या पुलावर थांबून नागरिक अनेकदा कोणत्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे उभी राहिल, याची वाट पाहत आणि प्लॅटफॉर्मवर रेल्वे दाखल झाल्यानंतरच प्रवासी प्लॅटफॉर्मवर जात असत.