नवी दिल्ली – ओलाच्या स्कूटर कारखान्यामध्ये तब्बल दहा हजार महिला कामगार काम करतील. पूर्णपणे महिलांनी चालवलेली ही जगातील सर्वात मोठी फॅक्टरी असेल. ओला कंपनीचे सहसंस्थापक भावेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आत्मनिर्भर महिला होणे गरजेचे आहे. यासाठी महिलाकामगारांची पहिली तुकडी नियुक्त करण्यात आली आहे. या महिलांना आवश्यक ते कौशल्य प्रदान केले जाईल. त्यानंतर या प्रकल्पात सर्व महिला कामगार कार्यरत असतील.
भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये केवळ 12 टक्के महिला आहेत. हे प्रमाण वेगात वाढविण्याची गरज आहे. त्यानंतर एक संतुलित समाज व्यवस्था विकसित होईल.
ओलाचा कारखाना तामिळनाडूमध्ये आकारास येत असून या कारखान्यांची क्षमता 20 लाख स्कूटर प्रति वर्ष इतकी वाढविण्यात येणार आहे. या स्कूटरसाठी नोंदणीकरिता चांगला प्रतिसाद मिळाला असून 15 सप्टेंबर पासून ती स्कूटर ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.