दुबई : संयुक्त अरब अमिरातचे (युएई) पंतप्रधान आणि दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांना पत्नीकडून घटस्फोट घेणे चांगलेच महागात पडले असल्याचे दिसत आहे. कारण घटस्फोटानंतर मुलांच्या कस्टडी प्रकरणामध्ये ७३० मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ पाच हजार ५०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
लंडन उच्च न्यायालयात शेख आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी आणि जॉर्डनच्या राजकुमारी हया बिंत अल हुसैन यांच्यात न्यायलयीन लढा सुरु आहे. याच याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पाच हजार ५०० कोटींची रक्कम देण्याचे आदेश दिलेत. हा निर्णय म्हणजे हया बिंत अल हुसैन यांचा मोठा विजय असल्याचे सांगण्यात येत आहे.
हया बिंत अल हुसैन या जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची बहीण आहे. हया आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या आयुष्यभराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून न्यायालयाने एवढी मोठी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायमूर्ती फिलिप मूर यांनी निकाल देताना हया बिंत अल हुसैन आणि दोन्ही मुलांच्या जीवाला आयुष्यभर धोका असल्याचा मुद्दा लक्षात घेवून एवढी मोठी रक्कम देण्याचा आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शेख यांच्याकडूनच या तिघांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. “ती (हया बिंत अल हुसैन) स्वत:साठी पैसा मागत नाहीय. तिला केवळ तिच्या सुरक्षेसाठीचा मोबदला हवाय. लग्न मोडल्याने जे नुकसान झालं आहे त्याचा मोबदला तिला हवाय,” असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.
न्यायालयाने शेख यांना दिलेल्या निर्देशानुसार, २५१ मिलियन पाउंडची रक्कम पुढील तीन महिन्यांमध्ये हया बिंत अल हुसैन यांना द्यावी लागणार आहे. या पैशांमधून हया ब्रिटनमधील आपल्या बंगल्याच्या देखरेखीचा खर्च करु शकतील असेही न्यायालयाने म्हटले आहे. शेख यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणे आवश्यक असल्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
जलीला (१४) आणि जायद (९) या दोघांच्या शिक्षणासाठी ९.६ मिलियन पाउंडची रक्कम टप्प्याटप्प्यात देण्यात यावी असे न्यायालयाने निकालामध्ये म्हटले आहे. तसेच मुलाची देखभाल करण्यासाठी ११.२ मिलियन पाउंडची रक्कम दर वर्षी देण्याचे आदेश न्यायलायने दिलेत. दोन्ही मुलं सज्ञान होईपर्यंत ही रक्कम शेख यांना दरवर्षी द्यावी लागणार आहेत.
या संपूर्ण रक्कमेसाठी २९० मिलियन पाउंडची रक्कम एचएसबीसी बँकेमध्ये गँरंटी म्हणून ठेवावी लागणार आहे. ब्रिटनमधील कोणत्याही कौटुंबिक कलहाच्या न्यायालयीन खटल्यामधील ही सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम आहे. मात्र असे असले तरी ही रक्कम हया बिंत अल हुसैन यांनी मागणी केलेल्या रक्कमेपेक्षा फार कमी आहे. हया यांनी १.४ बिलियन पाउंडची मागणी केली होती. “शेख यांच्या प्रभावापासून मला माझ्या मुलांना मुक्त करायचं आहे,” असे हया यांनी न्यायालयाला सांगितले.